Rohit Sharma Becomes First Batter with Most Sixes for Mumbai Indians Broke Kieron Pollard Record completes 12000 Runs in T20 IPL 2025

SRH vs MI IPL 2025 Rohit Sharma Broke Kieron Pollard Record: रोहित शर्मा आयपीएलमध्ये फॉर्मात परतला असून त्याची हिटमॅन अंदाजातील फटकेबाजी पाहायला मिळत आहे. रोहित शर्माने सलग दोन अर्धशतकं झळकावत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. त्याने पुन्हा एकदा चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून आपला फॉर्म दाखवला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
रोहित शर्माने सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात ४६ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ७० धावांची उत्कृष्ट खेळी केली. रोहित शर्माने २०१६ नंतर प्रथमच आयपीएलमध्ये लागोपाठ अर्धशतकं झळकावली आहेत. रोहित शर्मा आणि सूर्यादादाच्या फटकेबाजीने मुंबईला पुन्हा एकदा शानदार विजय मिळवून दिला. यादरम्यान रोहित शर्माने दोन मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत.
रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. हा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी फक्त विराट कोहलीच टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा टप्पा गाठू शकला आहे. आता रोहितही खास खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. याशिवाय त्याने कायरन पोलार्डला मागे टाकलं आहे.
रोहित शर्माने या सामन्यापूर्वी ४५५ टी-२० सामन्यांमध्ये ११,९८८ धावा केल्या होत्या. म्हणजे तो १२ हजार धावांच्या अगदी जवळ होता. हैदराबादमध्ये सनरायझर्सविरुद्ध खेळताना त्याने १२ हजार धावांचा टप्पा गाठला आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करून आणि चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून त्याने हा खास टप्पा गाठला.
रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने कायरन पोलार्डला मागे टाकत हैदराबादविरूद्ध सामन्यात हा टप्पा गाठला. रोहितच्या नावावर आता मुंबई इंडियन्सकडून २५९ षटकार आहेत, ज्यामध्ये आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगमधील सामने आहेत. तर त्याने कायरन पोलार्डला मागे टाकलं आहे, ज्याच्या नावावर २५८ षटकार आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आहे ज्याच्या नावावर १२७ षटकार आहेत तर हार्दिक पंड्या ११५ षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत पाचव्या क्रमांकावर इशान किशन आहे ज्याने १०६ षटकार लगावले आहेत, परंतु तो सध्या सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे.
मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज
२५९ – रोहित शर्मा*
२५८ – किरॉन पोलार्ड
१२७ – सूर्यकुमार यादव*
११५ – हार्दिक पांड्या*
१०६ – इशान किशन