Pahalgam Terror Attack Danish Kaneria slams Pakistan PMs silence over Tourist Attack Said you’re sheltering and nurturing terrorists

Pahalgam Terror Attack Update: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये २७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या आतंकवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश शोकाकुल आहे. २२ एप्रिल रोजी दुपारी पर्यटकांवर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात वेदना आणि संताप आहे. दहशतवाद्यांना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
भारतीय क्रिकेटपटूंनीही पोस्ट शेअर करत याबाबत जाहीर निषेध नोंदवला. विराट कोहली, मोहम्मद सिराज, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनाही या हल्ल्याबद्दल आपलं दु:ख व्यक्त केलं. सिराजने तर अशी मागणी केली आहे की दहशतवाद्यांना शोधून त्यांना कोणत्याही प्रकारची दया न दाखवता शिक्षा करावी. दरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटूची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने या हल्ल्याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कनेरिया म्हणाला की जर पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानची कोणतीही भूमिका नाही तर शरीफ यांनी अद्याप त्यावर प्रतिक्रिया का दिली नाही. दानिश कनेरियाच्या मते पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो आणि त्यांना या कृत्याबाबत लाज वाटली पाहिजे.
कनेरियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवाज शरीफवर आरोप करून हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले. दानिश कनेरिया म्हणाला, “जर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा खरोखरच हात नसेल तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया का दिली नाही? तुम्ही अचानक तुमच्या सैन्याला हाय अलर्टवर का ठेवलं, कारण तुम्हाला सत्य काय आहे हे माहित आहे. तुम्ही दहशतवाद्यांना आश्रय आणि संरक्षण देता. लाज वाटली पाहिजे.”
पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे मोठे निर्णय
१९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ स्थगित.
संयुक्त चेकपोस्ट अटारी बॉर्डर तात्काळ प्रभावाने बंद.
पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी रद्द.
पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले व्हिसा रद्द.
सध्या भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत सोडावा.
पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावा.
इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना माघारी बोलवण्याचा निर्णय.