Mumbai fashion street closed due to maratha reservation मुंबई : फॅशन स्ट्रीट बंद

मुंबई : मुंबईत फिरायला येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण हे फॅशन स्ट्रीट आहे. स्वस्त दरात कपडे व इतर सामग्री मिळत असल्याने, फॅशन स्ट्रीटवर कायम गर्दी असते. परंतु, मराठा आंदोलन सुरू असल्याने सलग तीन दिवस फॅशन स्ट्रीट बंद आहे. दुसरीकडे मराठा आंदोलक मुंबईतील विविध ठिकाणी खरेदीसाठी जात असल्याचे दिसून आले.
आझाद मैदानाजवळील महात्मा गांधी मार्गावरील फॅशन स्ट्रीटमध्ये सर्व प्रकारच्या वस्तू आणि कपडे येथे मिळत असल्याने तरुणाईची प्रचंड गर्दी तेथे असते. देश- विदेशातील पर्यटक मुंबईत आल्यानंतर कपडे खरेदीसाठी फॅशन स्ट्रीटला जातात. सणउत्सवाच्या काळात फॅशन स्ट्रीटवरील दुकानांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते. परंतु ती बाजारपेठ मराठा आंदोलनामुळे गेली तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे. तसेच या दुकानांमध्ये काम करणाऱ्या मजुरांना आंदोलनाची झळ बसू लागली आहे. कामगारांचे दिवसाचे दोन वेळचे जेवण, चहा पाणी याचा खर्च सुमारे ३०० रुपयांचा आहे. परंतु, दुकाने बंद असल्याने तेथील रोजंदारीवरील शेकडो कामगारांना आर्थिक फटका बसू लागला आहे, असे मत एका कामगाराने व्यक्त केले.
विविध ठिकाणी आंदोलक खरेदीला
फॅशन स्ट्रीट बंद असल्याने आंदोलकांनी मुंबईतील विविध ठिकाणी खरेदी केली. सीएसएमटी स्थानकाजवळील सबवे, चर्चगेट सबवे आणि स्थानकाजवळील पदपथावर असलेल्या विक्रेत्यांकडून आंदोलकांनी विविध वस्तू खरेदी केल्या.
सीएसएमटीत कबड्डी, उड्ड्यांचा खेळ
तरुण मराठा आंदोलकांनी सीएसएमटीत कबड्डी, उड्ड्यांचा खेळ खेळला. तसेच, आझाद मैदानातही कबड्डी, क्रिकेट खेळाचा आनंद लुटला.
वैद्यकीय उपचार घेण्यासाठी रांगा
आझाद मैदानात मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने तीन पथके तैनात केली आहेत. मैदानाबाहेर विविध संस्थांनी वैद्यकीय पथके तैनात केली आहेत. काही मराठा आंदोलकांनी वैद्यकीय तपासणी करून, औषधे घेतली. ताप, थंडी, कंबर दुखी, डोकेदुखीसाठी आंदोलकांनी औषधे घेतली.